Strait of Hormuz Tension : जगाची 'एनर्जी लाईफलाईन' समजल्या जाणाऱ्या हॉर्मुझ सामुद्रधुनीवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे या अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गावर धोका निर्माण झाला असून, यामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत 'भडका' उडण्याची भीती निर्माण झाली आहे. जर हा मार्ग विस्कळीत झाला, तर केवळ तेलच नाही, तर संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था कोलमडू शकते.
हॉर्मुझ जलमार्ग इतका महत्त्वाची का?
हॉर्मुझची सामुद्रधुनी हा केवळ एक सागरी मार्ग नाही, तर जगाची आर्थिक नाडी आहे. जगातील एकूण सागरी तेल पुरवठ्यापैकी ३१% कच्चे तेल (रोज सुमारे १.३ कोटी बॅरल) याच मार्गावरून जाते. हा मार्ग पर्शियन गल्फ आणि अरबी समुद्राला जोडतो. हा मार्ग बंद होणे म्हणजे जागतिक तेल पुरवठ्याचा 'ट्रॅफिक जाम' होणे होय.
तणावाचे मुख्य कारण काय?
इराणमध्ये सध्या अंतर्गत निदर्शने वाढत आहेत. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कठोर लष्करी कारवाईच्या पर्यायांवर विचार करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, जर अमेरिकेने कोणतेही लष्करी पाऊल उचलले, तर इराण प्रत्युत्तर म्हणून हॉर्मुझची जलसंधी रोखू शकतो.
मार्ग बंद झाल्यास काय होईल?
अफवा पसरताच तेलाचे दर काही डॉलर्सनी वाढतील. मात्र, मार्ग प्रत्यक्षात बंद झाल्यास कच्च्या तेलाच्या किमतीत १० ते २० डॉलर प्रति बॅरल इतकी थेट वाढ होऊ शकते. जहाजांचा विमा आणि वाहतुकीचा खर्च गगनाला भिडेल. शेअर बाजारात मोठी घसरण होऊन ऊर्जा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील शेअर्सना फटका बसेल.
भारतावर याचा सर्वाधिक परिणाम का?
तेल आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारत आपल्या गरजेच्या ८०% पेक्षा जास्त तेल आयात करतो. यातील मोठा हिस्सा हॉर्मुझ मार्गाने येतो. कच्चे तेल महागले की पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील. याचा परिणाम मालवाहतुकीवर होऊन अन्नधान्य आणि इतर वस्तू महाग होतील. आयातीचे बिल वाढल्यामुळे डॉलरची मागणी वाढेल आणि भारतीय रुपया आणखी कमकुवत होईल.
वाचा - ८ वा वेतन आयोग : मूळ पगार दुप्पट होणार? 'फिटमेंट फॅक्टर'नुसार तुमचा पगार नेमका किती वाढू शकतो?
धोका किती वास्तव आहे?
सध्या हा धोका 'कमी संभाव्य' मानला जात आहे. कारण या मार्गावर अमेरिकन नौदलाची सतत गस्त असते. जागतिक बाजारात सध्या तेलाचा मुबलक साठा उपलब्ध आहे, ज्यामुळे तात्काळ धक्का सहन करण्याची क्षमता आहे. इराण हा मार्ग पूर्णपणे बंद करू शकणार नाही, मात्र टँकरच्या वाहतुकीत अडथळे आणून जागतिक तणाव नक्कीच वाढवू शकतो.
